CoronaVirus News: कृषी कर्जावरील व्याज, वीजबिल माफ करावे, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:50 AM2020-05-01T04:50:02+5:302020-05-01T04:50:13+5:30
पोल्ट्री उद्योगांना देखील केंद्राने विशेष पॅकेज द्यावे, अशा शिफारशी काँग्रेसने नेमलेल्या टास्क फोर्सने केल्या आहेत.
मुंबई : खरिप हंगाम लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी कर्जावरील ६ महिन्यांचे व्याज आणि वीजबील माफ करावे. बी-बियाणे, खताची मुबलक उपलब्धता कशी होईल यावर लक्ष द्यावे, तसेच पोल्ट्री उद्योगांना देखील केंद्राने विशेष पॅकेज द्यावे, अशा शिफारशी काँग्रेसने नेमलेल्या टास्क फोर्सने केल्या आहेत.
कोरोना विरोधातील लढ्यात विधायक सहकार्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकर हे टास्क फोर्सचे समन्वयक तर डॉ. अमोल देशमुख सचिव आहेत.
चव्हाण म्हणाले, डॉक्टरांना आवश्यक असणारे पीपीई किट व एन - ९५ मास्कची जिल्हावार किती आवश्यकता आहे, यासह कोरोनासाठी लागणाºया उपकरणांची किंमत सगळीकडे सारखी असावी. रेशन कार्ड नसले तरी प्रत्येक व्यक्तीला सप्टेंबर महिन्यापर्यंत १० किलो धान्य मोफत द्यावे, पुढील दोन महिने डाळ, तेल, साखर यांचा मुबलक पुरवठा होईल हे पहावे, असेही त्यांनी सांगितले.