- मनोहर कुंभेजकर मुंबई : पालिकेच्या के पश्चिम वॉर्डमधील सुमारे साडेसहा लाख लोकवस्तीत विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हा भाग मोडतो. येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहेत. काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण कोरोना रुग्ण ३०५६ इतके होते, त्यापैकी आतापर्यंत १७१६ कोरोना रुग्ण बरे झाले, २१५ नागरिकांचा मृत्यू झाला. आता कालपर्यंत के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण ११२५ इतके असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला दिली.के पश्चिम वॉर्डमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्ड सरसावला असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असल्याचे चित्र आहे. परिमंडळ ४ चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी कोणती उपाययोजना राबवल्या पाहिजे याची माहिती देणारी सविस्तर नोटीस जारी केली आहे.जर सोसायटीत किंवा इमारतीत कोविड रुग्ण किंवा होम क्वारंटाइन रुग्ण असेल तर त्याच्याशी भेदभाव करु नका आणि त्यांचा अपमान करू नका, त्याला चांगली वागणूक देण्यात यावी असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच सोसायटीच्या ज्या सदस्यांना अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जावे लागते त्यांना सोसायटीने कामावर जाण्याची परवानगी देऊन रोज त्यांची सोसायटीने आॅक्सिमीटर, थर्मल डिटेक्टरमार्फत तपासणी करावी अशाही महत्त्वाच्या सूचना या नोटीसमध्ये नमूद आहेत.या नोटीसमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक व १५ वर्षांखालील मुलांना घरात ठेवा, स्क्रिनिंग करण्यासाठी तसेच कोरोनाची लक्षणे आहेत का, अशी विचारणा करायला पालिकेच्या आरोग्य खात्याचे कर्मचारी आपल्या घरी येतील तर त्यांना सहकार्य करा, तसेच जर नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, अन्न बेचव लागत असेल, श्वासोश्वासाला त्रास होत असेल तर लगेच या वॉर्डच्या वॉररूमशी संपर्क साधावा, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना या नोटीसमध्ये करण्यात आल्या आहेत.तपशीलवार सूचनासोसायटीच्या जागेत जर विलगीकरणाची सुविधा तसेच आॅक्सिजन सिलिंडरची सुविधा उपलब्ध असेल तर त्याचा सुयोग्य वापर करत असल्याची माहिती या वॉर्डच्या वैद्यकीय अधीक्षकाला देण्यात यावी, सोसायट्यांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आॅक्सिमीटर, थर्मल डिटेक्टरमार्फत तपासणी खासगी एजन्सीमार्फत करावी, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्ड सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:49 AM