मुंबई : सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत महिंद्र अॅण्ड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी व्यक्त केले आहे. देशामध्ये सध्या सुरू असलेला लॉकडाऊन त्वरित उठवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अर्थव्यवस्था परत रुळावर आणणे हे एक मोठे आव्हान आहे, पण त्यासाठी लॉकडाउन वाढविणे हा इलाज असू शकत नाही, असे सांगत महिंद्र म्हणाले, यापूर्वीही मी लॉकडाउन उठविण्याची मागणी केली आहे.लॉकडाउनला ४९ दिवस झाल्यानंतर आपण लॉकडाउन उठविण्याची मागणी केली होती, पण कालावधी ३१ मेपर्यंत वाढविला गेला. २२ मार्चलाच लॉकडाउन लावण्यापूर्वीच आपण तो वारंवार वाढविला जाईल याबद्दल चिंता व्यक्त केली होती, असेही महिंद्र यांनी सांगितले.
सरकारसमोर आहे मोठे आव्हान
लॉकडाऊनमध्ये कोविड-१९ व्यतिरिक्त जे रुग्ण आजारी आहेत, त्यांची आबाळ होण्याची शक्यता आहे व त्यातून मानसिक आजार बळावण्याचा धोका आहे, असेही महिंद्र म्हणाले. कोरोनाचे रुग्ण यापुढेही वाढत राहतील. त्यामुळे त्यांच्यासाठी दवाखान्यात बेड तयार ठेवणे व प्राणवायूचा पुरवठा करणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.