मुंबई : सरत्या वर्षातील तब्बल दहा महिने लाॅकडाऊनमध्येच गेले. २०२१ या नव्या वर्षातील जानेवारीचा पहिला महिनासुद्धा लाॅकडाऊनमध्येच असणार आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत ३१ जानेवारी २०२१पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला असून, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवारी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
लाॅकडाऊनचा कालावधी महिनाभरासाठी वाढविण्यात आला असला तरी ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या सवलती कायम असतील. तर प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू असलेले निर्बंध कायम असतील. पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळी गेले आहेत. अशा ठिकाणीही निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश लागू आहेत. रात्री ११नंतर सर्व आस्थापना बंद होणार आहेत. रात्री घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर जाऊन औषधे आणणे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत.
कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने आणि साधेपणाने करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेले निर्बंध कायम आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शिर्डीचे साईमंदिर आज रात्रभर खुले राहणारभाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ डिसेंबरला रात्री शिर्डीचे साईमंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर १ जानेवारीला सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील, असा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.