Join us

CoronaVirus News: पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:54 AM

राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना बंदी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी होईल अशा सर्व धार्मिक, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, यात्रांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच, पुढील आठवडाभर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, पाळली जाणारी शिस्त याचा आढावा घेऊन राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लावायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट दरवाजावर धडका मारत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरसारख्या उपायांचे काटेकोर पालन करणे आवश्यक बनले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध परवानग्या दिल्या. मात्र, त्यामुळे सर्वत्र गाफिलपणा आला आहे. अशाच मानसिकतेमुळे पाश्चिमात्य देशांवर दुसऱ्यांदा कठोर लाॅकडाऊन लादण्याची वेळ आली असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुन्हा एक आॅनलाइन उद्घाटन

आजच्या रायगड येथील उद्घाटन कार्यक्रमाला कमीतकमी लोक उपस्थित राहतील, शिवाय कोरोनाचे निर्बंध पाळण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमानंतरचे पुढील सर्व कार्यक्रम पहिल्याप्रमाणे आॅनलाईन किंवा ई-पद्धतीने करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी  स्पष्ट केले.

राज्यपालांसह विरोधक आणि सहकारी पक्षांनाही टोले

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांसह विरोधक आणि सहकारी पक्षांचेही आजच्या संबोधनात एक प्रकारे कान टोचले. अलीकडे कोविड योद्धयांचा सत्कार सुरू झाला आहे. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे का बंद, ते का सुरू नाही, अशा भूमिका घेणाऱ्यांनी केलेले कार्यक्रम थोतांड आहेत. आपण कोविड योद्धे बनू शकलो नाही तरी किमान कोविड दूत तरी बनू नकात, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपालांच्या उपस्थितीत कोविड योद्धयांच्या सत्काराचे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. त्याकडे हा अंगुली निर्देश मानला जात आहे. तर, लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत, म्हणत भाजपला सुनावले.

टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन

यवतमाळ, अमरावती अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत आहेत. अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाने काही अवधी देऊन लाॅकडाऊन लागू करावा. अचानक लाॅकडाऊन लावणे किंवा अचानक सर्व सुरू करण्याचा प्रकार टाळण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिली.

तेव्हाच सर्वसामान्यांसाठी लसीकरण

राज्यात ९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. बाकी सर्वसामान्यांचा लसीकरणाचा विषय 'उपरवाले के' म्हणजेच केंद्राच्या हातात आहे. पण, येत्या काही काळात आणखी ३-४ लसी उपलब्ध होतील. त्या आल्या की सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केले जाईल, असेही ते म्हणाले.

मास्क हीच ढाल

कोरोनाच्या आजारावर सध्यातरी कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडणे, इतकेच आपल्या हाती आहे. हाँल, रेस्टाॅरंट आदी ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर मालकांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.  

होय, मीच जबाबदार!

माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेनंतर आता होय, मीच जबाबदार, या मोहिमेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा, नियम पाळा आणि कोरोना टाळा. अन्यथा पुढील आठ दिवसांत आढवा घेऊन लाॅकडाऊन लावावा लागेल.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार