मुंबई : लॉकडाउनचा चौथा टप्पाही आता अंतिम टप्प्यात आला असून आता तरी लॉकडाउन हटणार का, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. यावर, सरसकट लॉकडाउन हटणार नसल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना लॉकडाउनमधून सवलती जाहीर केल्या जातील. टप्प्याटप्प्यानेच लॉकडाउन शिथिल केले जाणार आहे. त्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक योजना तयार करत असल्याची माहितीही मुख्य सचिवांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रदीप व्यास आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी मंगळवारी माध्यमांना संबोधित केले. मेहता म्हणाले की, टप्प्याटप्यानेच लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढणार हे गृहीत धरूनच उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बेडची संख्या वाढविणे, अलगीकरणाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.