मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याबाहेरील मजूर परत जात आहेत. लाेकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे स्थानकावर रविवारी रणरणत्या उन्हात आपापल्या गावाकडे परतणाऱ्यांचे तांडे पाहायला मिळाले.रविवारी दुपारी रणरणत्या उन्हात मजूर आपल्या कुटुंबीयांसह एलटीटी स्थानकात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे नियोजन केलेले नव्हते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, बॅगा आणि इतर आवश्यक वस्तू सोबत घेऊन हे मजूर गावी निघाले आहेत. काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली. निर्बध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या-छाेट्या कंपन्यामधील कामगार, लघु व्यावसायिक,राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झालेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस पुन्हा नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी,पनवेल तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या चालविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या या उत्तर प्रदेश, बिहार, पटनाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रेल्वे स्थानक परिसरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येत नसल्याचे चित्र हाेते. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.प्रवाशांनी घेतला झाडाचा आधारएलटीटी स्थानकात योग्य नियोजन नसल्याने रविवारी प्रवाशांनी गर्दी केली होती. उन्हाच्या झळा सहन न झाल्याने अनेकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला. कोरोना चाचणी नाहीकोरोना रुग्ण वाढल्याने गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र रविवारी एलटीटी स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नव्हती.याेग्य नियाेजन करावेकोरोनामुळे मजूर गावी जात आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करावे. तसेच प्रवाशांना योग्य सोयीसुविधा द्याव्यात.- कृपाशंकर सिंग, माजी आमदारगावावरुनच तिकिटासाठी मागवून घेतले पैसेमी ॲण्टाप हिल येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. लॉकडाऊनच्या भीतीने आम्हाला कामावरून कमी करण्यात आले आहे. गेल्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. कोरोना वाढत आहे त्यामुळे मी गावावरून तिकिटासाठी पैसे मागवून घेतले. - सौरभ मिश्रा, सुरक्षारक्षकघर चालवणे अवघडआता आठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळत आहे. त्या मिळणाऱ्या पैशांवर घर चालवणे अवघड आहे. संध्याकाळी जेवायची सोय नाही. हॉटेल बंद आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये गावी जाताना खूप हाल झाले होते. त्यामुळे आताच गावी चाललो आहे.- अहमद खान, कामगारआरक्षित तिकीट असणारेच करू शकतील प्रवासकेवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर तिकीट तपासनीस कारवाई करत आहेत. प्रवाशांनी मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
CoronaVirus News: रणरणत्या उन्ह्यातही एलटीटी स्थानकावर मजुरांचे तांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 4:32 AM