मुंबईः दारू खरेदीसाठी लोकांची होणारी गर्दी, त्यातून लॉकडाऊनच्या नियमांचे होणारे उल्लंघन लक्षात घेता मुंबई मनपाच्या हद्दीत आजपासून दारू विक्री बंद करण्यात आली आहे. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "दारुच्या दुकानांसमोर गर्दी होते म्हणून पुन्हा मुंबईतील सर्वच दुकाने बंद करण्याचा पालिकेचा निर्णय म्हणजे एक बोट दुखते म्हणून अख्खा हातच कापून टाकल्या सारखे आहे. राज्य शासन मुंबईकरांची गैरसोय तर करते आहेच पण छोट्या व्यापाऱ्यांनाही मारते आहे."
दरम्यान, कंटेनमेंट परिसर सोडून राज्यातील सर्व रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी आणि मंगळवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले आहे. दारू खरेदीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसचा फज्जा उडाला.
ग्राहकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण झाले. त्यातच राज्यातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. त्यामुळे दारू खरेदीसाठी लोकांची होणारी गर्दी पाहता मुंबई मनपाच्या हद्दीत आजपासून दारू विक्री बंद करण्यात आली आहे. आयुक्त प्रविण परदेशी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.