CoronaVirus News: धास्तावलेल्या मजुरांचे मुंबईतून स्थलांतर सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 03:38 AM2021-04-04T03:38:40+5:302021-04-04T06:59:43+5:30
लाॅकडाऊनच्या भीतीने गावी परतण्यासाठी लगबग
मुंबई : मुंबई-ठाणे परिसरात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, कोणत्याही क्षणी लॉकडाऊन जाहीर होईल आणि तो किती काळ असेल याबद्दलची अनिश्चितता यामुळे धास्तावलेल्या मजुरांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतून स्थलांतर सुरू ठेवले.
मजुरांनी त्यांच्या राज्यात जाताना ७२ तास अगोदर कोरोनाची चाचणी केलेली असावी, अन्यथा त्यांना त्यांच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, अशा उद्घोषणा रेल्वे स्थानकांत सुरू होत्या.
गेल्या वेळी अचानक लॉकडाऊन घोषित झाल्याने मजुरांचे अतोनात हाल झाले होते. अनेकांनी रस्त्यातून चालत, रेल्वे रुळांवरून मार्ग काढत प्रवास सुरू केला होता. मिळेल तेथे आसरा घेत, मिळेल तेथे खात, नाहीतर उपाशी राहून कसेबसे गाव गाठले होते. त्यानंतर अनेक राज्यांनी मजुरांना प्रवेश नाकारल्याने त्यावरूनही वाद झाले होते. तो अनुभव गाठीशी असल्याने अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या इशाऱ्यातून बोध घेत आधीच गाव गाठण्यास सुरुवात केली.
अमृतसर, चेन्नईसाठी विशेष गाडी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - अमृतसर दैनिक विशेष गाडी सीएसएमटीहून १० एप्रिलपासून दररोज २३.३० वाजता सुटेल आणि अमृतसरला तिसऱ्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल. अमृतसर येथून विशेष गाडी १३ एप्रिलपासून दररोज ०८.४५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे तिसऱ्या दिवशी ००.०५ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी - चेन्नई दैनिक अतिजलद विशेष गाडी १० एप्रिलपासून सीएसएमटीहून दररोज १२.४५ वाजता सुटेल आणि पूरैची थलिवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल. तर अतिजलद विशेष गाडी पूरैची थलिवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथून ११ एप्रिलपासून पूरैची थलिवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथून दररोज १३.२५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता पोहोचेल.