मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी अलगीकरण आणि विलगीकरण कक्षांची उभारणी सुरू केली आहे. देवरा यांनी डोंगरी परिसरातील निजाम बाग येथे १०० खाटांचे विलिगीकरण कक्ष महापालिकेकडे हस्तांतरित केले आहे. एकूण ९०० खाटांची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात येत आहे.लक्षणे आढळून येत नाहीत अशा कोरोना रूग्णांसाठीच्या विलगीकरण कक्षांची आवश्यकता आहे. पालिका आयुक्तांशी याबाबत चर्चा केली असून दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी ९०० खाटांची व्यवस्था केली जात आहे. अनंत युनिव्हर्सिटी आणि हॅबिटाट फॉर ह्युमॅनिटीच्या मदतीने या व्यवस्था उभ्या केल्या जात आहेत. या खाटांनाच आॅक्सिजन सिलेंडर जोडण्यात आले आहेत. शिवाय, लॅमिनेट केलेल्या या खाट्यांचे निर्जंतुकीकरण सहजपणे करता येणार असल्याचे देवरा यांनी सांगितले.मेट्रो सिनेमाजवळील सेंट झेवियर्स महाविद्यालयाने आपली जागा विलिगीकरणाच्या सुविधेसाठी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. इथे गोदरेज ग्रुपच्या सहकार्याने २५० खाटांची व्यवस्था केली जात आहे. आठवड्याभरात येथील कक्ष तयार होईल. याशिवाय, एमपी मिल कंपाऊंड परिसर आणि मलबार हिल परिसरातही अलगीकरण कक्ष उभारले जाणार असल्याचे देवरा यांनी सांगितले.
CoronaVirus News : मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईत ९०० खाटांच्या अलगीकरण कक्षाची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 5:09 AM