मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.
राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला हाेता. त्या तुलनेत साेमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसेे कमी झालेे. साेमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे.
९ लाख ८३ हजार जणांना लसीकरण
राज्यात सोमवारी ८२३ लसीकरण सत्रात एकूण ५७ हजार ३६७ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३६ हजार १८२ जणांना पहिल्या डोसचे व २१ हजार १८५ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले असून लाभार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार ७२० इतकी आहे.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२१ दिवसांवर
मुंबईत सोमवारी ६३४ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तीन लाख १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सोमवारी ३२१ दिवसांवर गेला आहे. रविवारी हा आकडा ३४६ दिवस होता. सध्या ७ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३१ लाख ४६ हजार ७२२ चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी दिवसभरात ७६० रुग्ण आणि चार मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाख १९ हजार ८८८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४४६ झाला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ५४ आहे. मागील २४ तासांत पालिकेने चार हजार ६४२ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.