CoronaVirus News : चंद्र, मंगळावरचे ‘रोव्हर’ ते रुग्णांसाठी ‘गोलर’, असा तयार झाला हायटेक कोविडयोद्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:59 AM2020-07-15T01:59:23+5:302020-07-15T09:15:45+5:30
२३ वर्षीय मिर्झा हा मेकॅट्रॉनिक्स इंजीनिअर आहे. रोबोट्सचे नवनवे आविष्कार करणं ही त्याची पॅशन. चंद्रावर, मंगळावर पाठवले जाणारे, पाण्याखाली चालणारे रोव्हर त्यानं तयार केलेत.
मुंबई : कोरोनारुग्णांच्या सेवेसाठी वरळीच्या पोद्दार रुग्णालयात ‘गोलर’ नावाचा रोबोट रुजू झाला आहे. रुग्णांना जेवण, पाणी, औषधं देण्याचं काम तो अत्यंत नेटकेपणाने करतोय. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठीच मदत होत आहे. हा रोबोट जितका किमयागार आहे, तितकाच त्याचा निर्माताही कल्पक आहे. मिर्झा सामनानी. इग्नाईट लॅब्स या त्याच्या कंपनीनं नासामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय आणि सात आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकलेत. त्याला ‘गोलर’ची कल्पना कशी सुचली, ती प्रत्यक्षात कशी साकारली याची गोष्ट त्यानं ‘लोकमत’ला सांगितली.
२३ वर्षीय मिर्झा हा मेकॅट्रॉनिक्स इंजीनिअर आहे. रोबोट्सचे नवनवे आविष्कार करणं ही त्याची पॅशन. चंद्रावर, मंगळावर पाठवले जाणारे, पाण्याखाली चालणारे रोव्हर त्यानं तयार केलेत. हे काम अत्यंत जिकिरीचं आणि जबाबदारीचं आहे. तसंच, कोरोनालढ्यासाठी गोलर रोबोट बनवणंही सोपं नव्हतं. या रोबोटचा पहिला प्रोटोटाईप बनविण्यासाठी सात दिवस लागले, तर प्रत्यक्ष काम करणारा ‘गोलर’ बनवायला दीड महिना लागल्याचं मिर्झा म्हणाला.
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रोव्हर्सचं काम थांबलं. कोरोना लढ्यात काहीतरी योगदान द्यायची मिर्झांची इच्छा होती. त्यावर विचार करताना डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय या कोविडयोद्ध्यांचं काम हलकं करणाºया रोबोटची कल्पना त्याला सुचली. कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देऊ शकणारा, तिथलं निर्जंतुकीकरण करू शकणारा, संपर्काचं माध्यम ठरू शकणारा रोबोट हळूहळू आकाराला येत गेला. डॉक्टर, नर्सेसशी बोलून, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यात आवश्यक बदल करण्यात आले. प्रसंगी पीपीई किट घालून मिर्झा आणि त्याच्या सहकाºयांनी प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये वेगवेगळी प्रात्यक्षिकं करून पाहिली-दाखवली. ती यशस्वी झाल्यानंतर, ७ जुलैला गोलरनं आपलं काम सुरू केलं आणि सगळेच खूश झाले.
या रोबोटमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबतचा संपर्क कमी होईल. परिणामी, पीपीई किटवरचा खर्च कमी होऊ शकेल आणि जैव वैद्यकीय कचऱ्याचं प्रमाणही घटेल.
एकावेळी हा रोबो ५५ ते ६० रुग्णांचे जेवण घेऊन जाऊ शकतो. यातील सेन्सरमुळे तो समोरील वस्तूंना आदळत नाही. या रोबोटचा कॅमेराही खूप वेगवान आहे. रुग्ण आणि ऑपरेटर दोन्हींना लगेचच संदेश आणि व्हिडीओ दिसतो. तसेच इंटरनेटला जोडलेला असल्यानं जगभरात जिथे जिथे नेटवर्क आहे, तिथून तो नियंत्रित करता येऊ शकतो. या रोबोटमध्ये ताकदवान मोटर लावलेली आहे. कॉम्प्युटर बेस सिस्टिम असून यामध्ये कर्मचारी ऑडिओ कमांडही देऊ शकतात. पेशंटसोबत बोलताही येऊ शकतं. एकदा चार्ज केल्यावर रोबोट चार ते पाच तास काम करू शकतो. ही क्षमता वाढविता येते. १०० टक्के चार्ज होण्यासाठी केवळ २ तास लागतात, अशी माहिती मिर्झाने दिली.
मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे. या लढाईमधील कोविड योद्धे सुरक्षित ठेवण्यासाठी गोलर हा रोबोट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही रोबोट गोलरच्या सेवेचा पहिला व्हिडीओ जारी केला आहे.
पोद्दार रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रज्ञा कापसे यांनी सांगितले, या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. रुग्णांना ज्या गोष्टी द्याव्या लागतात, जसे की डिस्पेंसरीसाठी खूप मोठी मदत होत आहे. डॉक्टरांचा होणारा जो धोका आहे तो कमी होणार आहे. औषधे, नाश्ता, जेवण, पाणी हे सर्व देण्यासाठी या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. डॉक्टरांचा जो रुग्णांशी होणारा संपर्क आहे तो कमी होणार आहे.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)