CoronaVirus News: उपनगरात कोरोना सक्रिय रुग्ण २९ हजारांपेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 02:04 AM2020-10-04T02:04:58+5:302020-10-04T07:07:56+5:30
CoronaVirus Mumbai News: गेल्या महिन्याभरात वाढला आकडा; सहा विभागांमधील संसर्ग रोखण्याचे आव्हान
मुंबई : गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा १७ हजारांवरून २९ हजारांवर पोहोचला आहे. मात्र ही वाढ प्रामुख्याने जोगेश्वरी-अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड, कांदिवली, बोरीवली आणि मुलुंड या सहा विभागांमध्ये सक्रिय रुग्ण अधिक आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या बोरीवली विभागात सक्रिय रुग्णांचे प्रमाण अडीच हजारांवर पोहोचले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या महिन्यात ५५ दिवसांपर्यंत खाली घसरला होता. महापालिकेने १५ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेनंतर यामध्ये सुधारणा दिसून येत आहे. सध्या ६४ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत असून दैनंदिन रुग्णवाढ १.०९ टक्के एवढी आहे. परंतु, पश्चिम उपनगरात विशेषत: अंधेरी पूर्व आणि पश्चिम तसेच बोरीवली विभागात मृतांची आणि सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
सक्रिय रुग्ण अधिक असलेले विभाग
विभाग आतापर्यंत रुग्ण सक्रिय रुग्ण
आर मध्य - बोरीवली १३६२५ २४७३
के पश्चिम - अंधेरी प., विलेपार्ले १२७४८ २०४०
पी उत्तर - मालाड १२४२५ १९९०
के पूर्व - जोगेश्वरी, अंधेरी पूर्व १२२८८ १८५१
आर दक्षिण - कांदिवली १११८२ १८९२
टी... मुलुंड ९४५३ १५४४
यामुळे अंधेरी, बोरीवली, मुलुंड ठरताहेत हॉटस्पॉट
के पश्चिम म्हणजेच सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी विभागात विमानतळ आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, औद्योगिक वसाहतींचे प्रमाण या विभागात अधिक आहे. या विभागाची लोकसंख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. पश्चिम उपनगरात बोरीवली येथे मीरा-भार्इंदर, वसई आणि पूर्व उपनगरात मुलुंड येथे ठाणे परिसरातील बाधित रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यामुळे या विभागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक दिसून येते, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सर्वाधिक मृत्यू
के पूर्व...जोगेश्वरी, अंधेरी पूर्व ६०१
जी उत्तर...धारावी, दादर ५६०
एस....भांडुप ५३७
एल...कुर्ला ४९१
एन....घाटकोपर ४७३