मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत राज्यभरात ८८ हजार ५२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी दिली. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 40,975 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितले.
तत्पूर्वी, केंद्र सरकारनं देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनंही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली. राज्य सरकारनंही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोमवारपासून राज्यभरात तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहे.
मुंबईतील खासगी कार्यालये दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू झाली आहेत. मात्र या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आणि लोकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचे संकट असल्याने महापालिका प्रशासनासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, भारतात लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच्या पहिल्याच दिवशी देशभरात कोरोनाचे १० हजारांवर रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ५६ हजारांवर गेली, तर मृत्यूची संख्या ७ हजार २०० वर पोहचली आहे.