CoronaVirus News : तीन वयोगटांतील कोरोनाचे रुग्ण लाखाहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:57 AM2020-08-19T04:57:18+5:302020-08-19T04:57:33+5:30
ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजेच ५१ ते ६० वयोगटातील रुग्ण ९५ हजार ७६८ इतके असून एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण १६.०७ टक्के आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्येत तीन वयोगटांतील रुग्णसंख्या लाखांच्या पार गेली आहे. त्यात २१ ते ३० वयोगटातील १ लाख ४ हजार ६९५ रुग्ण आहेत. ३१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या १ लाख २५ हजार ३२७ आहे, तर ४१ ते ५० वयोगटातील १७.७६ टक्के म्हणजे १ लाख ५ हजार ८५७ रुग्ण आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजेच ५१ ते ६० वयोगटातील रुग्ण ९५ हजार ७६८ इतके असून एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण १६.०७ टक्के आहे.
।महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण अधिक म्हणजे ६१ टक्के असून महिलांचे प्रमाण ३९ टक्के आहे. कोरोनामुळे ६५ टक्के पुरुषांना, तर ३५ टक्के महिलांना जीव गमवावा लागला आहे.
।बालरुग्णांची संख्या वाढतीच
बालकांना कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा अनेकांचा प्रारंभी समज होता. मात्र, बाधितांमधील बालकांचे प्रमाण पाहता हा समज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधितांमध्ये बालकांचे प्रमाण ४.०३ टक्के आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार, १० वर्षांपर्यंतच्या २३ हजार ९९५ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना झालेली ११ ते २० वयोगटातील ४२,५२९ मुले-मुली आहेत.
।रोगप्रतिकारशक्ती वाढवा
कोरोना प्रतिबंधासाठी बालकांची आणि त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून मोठ्यांनीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. गौरव गावंडे म्हणाले. स्वच्छता, सुरक्षित अंतर राखावे. कुठल्याही आजाराचे मूळ रोगप्रतिकारशक्तीचा अभाव आहे. ती मजबूत ठेवण्यास आहार, योग, प्राणायाम, हलका व्यायाम, पुरेशी झोप, सकारात्मक मन ही संजीवनी असल्याचा सल्ला त्यांनी दिला.