Join us

CoronaVirus News: मुंबईत ३० ते ४९ वयोगटांत सर्वाधिक काेराेनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:50 AM

पालिकेची माहिती; १ लाख ५० हजार जणांना लागण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत ३१ ते ४९ वयोगटांतील सर्वाधिक बाधित असल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाने दिली आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण १ लाख ५० हजार आहे. याखालोखाल, ५० ते ६९ वयोगटांतील १ लाख २८ हजार रुग्ण आहेत. मुंबईत मागील काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४२ दिवसांवर आला आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के आहे. नव्या निर्बंधांनंतर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, अशी आशा वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यातही २१ ते ३० वयोगटांत ४ लाख ९६ हजार २०४, ३१ ते ४० वयोगटांतील ६ लाख ३४ हजार ३८४ रुग्ण, ४१ ते ५० वयोगटांत ५ लाख ३६ हजार ५४३ इतक्या काेराेनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६१, तर महिला रुग्णांचे प्रमाण ३९ टक्के आहे. ३० ते ४९ वयोगटांतील व्यक्ती कामानिमित्त माेठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने त्यांच्यामध्ये काेराेनाची लागण हाेण्याचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज  तज्ज्ञांनी वर्तवला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटावी, याकरिता राज्य सरकारने नवीन निर्बंध जाहीर केले. त्याचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. यामुळे उपचाराधीन रुग्णांना कोरोनामुक्त करून खाटांची उपलब्धता वाढविण्यास मदत होईल. जास्तीतजास्त व्यक्तींना लस देऊन कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा नवा स्ट्रेन हा अतिशय घातकराज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, कोरोनाचा नवा स्ट्रेन हा अतिशय घातक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग हाेऊ नये म्हणून ठरावीक वयोगटाने अधिक खबरदारी घ्यावी, सहव्याधी असणाऱ्यांनी संसर्ग होण्यापासून दूर राहावे. साेबतच, सध्याच्या स्थितीत शक्य तितक्या व्यक्तींनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर यांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या