CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत म्युकरचा प्रादुर्भाव कायम; मुंबईत ७० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:38 AM2022-01-19T06:38:10+5:302022-01-19T06:38:32+5:30
मुंबईच्या खासगी रुग्णालयात ७० वर्षीय कोविड रुग्णाला म्युकरची लागण झाली असून त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही म्युकरचा प्रादुर्भाव कायम असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नुकतीच मुंबईच्या खासगी रुग्णालयात ७० वर्षीय कोविड रुग्णाला म्युकरची लागण झाली असून त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
५ जानेवारी रोजी ७० वर्षांच्या वृद्धाची कोविड चाचणी झाली, आणि १२ जानेवारी रोजी अशक्तपणाच्या तक्रारीसह त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्या लघवीतील केटोन्ससह रक्तातील साखरेची पातळी ५३२ वर गेली होती. लगेचच डॉक्टरांनी डायबेटिक केटोॲसिडोसिसवर उपचार सुरू केले आणि आवश्यक तपासण्या केल्या. त्यावेळी रुग्ण स्टिरॉइड्सवर नव्हता.
तिसऱ्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला डॉ. हनी सावला यांना रुग्णाने गालात दुखत असण्याची तक्रार केली, जी असामान्य होती आणि एक सूज आली होती. जी पूर्वी म्हणजे रुग्णालयात दाखल करताना नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी चेहऱ्याच्या डाव्या बाजूला सूज आणि वेदना वाढल्या आणि त्याला लिड इडेमेटोसिस झाल्याचे निदान झाले. तर कोह माउंटसाठी अनुनासिक स्वॅबमध्ये बुरशीजन्य हायफेचा विकास उघड केला. तसेच केलेल्या इतर चाचण्यांत म्युकरमायकोसिसचे निदान झाले.
दीर्घकाळ घ्यावे लागणार अँटिफंगल उपचार
डॉक्टरांनी तातडीने रुग्णावर आवश्यक उपचार सुरू केले व आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि ती सध्या इंट्राव्हेनस अँटिफंगलवर आहे. त्याला अजूनही अनेक डिब्रीडमेंट्समधून जावे लागेल आणि दीर्घ कालावधीसाठी अँटिफंगल उपचार घ्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.