CoronaVirus News in Mumbai : कोरोना रुग्णांसाठी १ लाख खाटांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:22 AM2020-05-20T06:22:55+5:302020-05-20T06:23:04+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : विलगीकरण केंद्रासाठी गोरेगाव येथील नेस्को, वरळीत एन.एस.सी.आय. क्रीडा संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील नवीन रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत ४५ हजार रुग्ण असतील, अशी भीती व्यक्त होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खाटांची क्षमता एक लाखापर्यंत वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. विलगीकरण केंद्रासाठी गोरेगाव येथील नेस्को, वरळीत एन.एस.सी.आय. क्रीडा संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील नवीन रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आणखी १७०० कोविड योद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २१ हजारांवर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज ८ मेपासून कार्यरत आहे. त्यामुळे दहा दिवसांनी रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४.५ दिवसांवर आणण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. मात्र ३१ मेपर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज राज्य सरकार आणि पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे. त्यानुसार सध्या असलेली ५० हजार खाटांची क्षमता वाढवून एक लाखापर्यंत नेणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सायन रुग्णालयाच्या पाहणी दौºयावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.
वैद्यकीय मनुष्यबळ वाढवणार
कोरोनाविरोधातील लढ्यात आता १७०० ‘कोविड योद्धा’ उतरणार आहेत. यामध्ये २४२ डॉक्टर्स, ५५० नर्स आणि इतर आरोग्य सेवकांचा समावेश आहे. त्यांची सेव्हन हिल्स, एनएससीआय डोम वरळी, बीकेसी, नेस्को सेंटर आदी ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.
अशी सुरू आहे व्यवस्था
वांद्रे-कुर्ला संकुल : एमएमआरडीए मैदानात एक हजार खाटांची क्षमता असलेले केंद्र तयार करण्यात आले आहे. पुढे ही क्षमता पाच हजारांपर्यंत वाढवता येणार आहे. यात ५०० खाटांवर आॅक्सिजन उपलब्ध आहेत. या आरोग्य केंद्रात तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) म्हणजेच सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातील. रुग्णांसाठी निवास, आॅक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आणि क्वारंटाइनची सुविधा दिली जाणार आहे. याचा पूर्ण खर्च ‘एमएमआरडीए’ करीत आहे.
वरळी, महालक्ष्मी येथे व्यवस्था
वरळी परिसरातील एन.एस.सी.आय. क्रीडा संकुलात खाटांची क्षमता वाढवून ६५० करण्यात आली आहे. तसेच या परिसरात लवकरच ४० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात ३०० खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांसाठी नायरमध्ये एक हजार खाटा
पालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ७५० खाटा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोनाबाधित मातांसाठी ११० खाटा, डायलिसिस रुग्णांसाठी ५० खाटा, ५३ खाटा अतिदक्षता विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यात ९६ खाटा संशयित रुग्णांसाठी राखीव आहेत. तसेच मुंबईतील पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयातही व्यवस्था केली जात आहे.