CoronaVirus News in Mumbai : मुंबईत आणखी १ लाख खाटा उपलब्ध करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:03 AM2020-05-17T02:03:30+5:302020-05-17T06:47:01+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारपासून बीकेसी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जात आहे.
मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत आणखी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
सोमवारपासून बीकेसी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जात आहे. तसेच मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
वरळी येथील एनएससीआय डोम मध्ये ६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या लगत असलेल्या नेहरु प्लॅनेटोरीयम येथेही सुमारे ५०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. बीकेसी येथील कोरोना केअर सेंटर केवळ २० दिवसांमध्ये तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये १००८ खाटांची सुविधा असून तेथे नव्याने एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णवाढीचा वेग आटोक्यात
जूनपर्यंत रुग्ण दुपटीचा वेग पाहता अधिक काळजी घेण्यात आहे. मात्र ज्या गणितीय शास्त्रानुसार मुंबईत रुग्णवाढीचा अंदाज वर्तविण्यात आला होता, तेवढ्या रुग्णांची वाढ झालेली नाही. लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते, अशी टिपण्णीही टोपे यांनी केली.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार
राज्यभरातील आरोग्य विभागातील १७ हजार, ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.