- मनीषा म्हात्रेमुंबई : शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवले असताना, याच पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार संध्या शीलवंत यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जोपासत एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव असली की, भीतीचे दरवाजेही बंद होतात, असे त्यांनी सांगितले.विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे पती, १३ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासोबत राहणाऱ्या संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून म्हणून कार्यरत आहेत. आई, पत्नी, सून या जबाबदाºया पार पाडत असतानाच पोलीस दलातील कर्तव्यही त्या चोख बजावत आहेत.एडीआर कारकून (मृतदेहांची नोंद करण्याचे कामकाज) म्हणून काम करणाऱ्या पोलिसांमध्ये महिला पोलीस बेवारस मृतदेहाची नोंद करत, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. अखेर त्याच त्यांचे नातलग बनून अंत्यसंस्कारही करत आहेत. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील मृतदेहाशेजारी सुरू असलेल्या उपचाराच्या व्हिडीओने सर्वांनाच सुन्न केले. त्याचदिवशी संध्या यांनी ४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यात एक कोरोनाबाधित मृतदेहाचाही समावेश होता.जिथे नातेवाईकही कोरोनाच्या मृतदेहाजवळ जायला घाबरतात तिथे लॉकडाउनच्या काळात त्यांनी एकूण ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून त्या आपली जबाबदारी खंबीरपणे पेलत आहेत. कोरोना संकटात काम करताना सकारात्मक विचार आणि योग्य ती खबरदारी घेत काम करत असल्याचे संध्या यांनी सांगितले.सहकार्यामुळे मिळते नवी ऊर्जावरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास गंगावणे तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासह सासू सासऱ्यांच्या सहकार्यामुळेच इच्छाशक्ती अधिक प्रबळ होते आणि काम करायला नवीन ऊर्जा मिळते, असे पोलीस अंमलदार संध्या शीलवंत यांनी सांगितले.
CoronaVirus News in Mumbai : महिला पोलिसाने केले एकाच दिवशी ४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 5:49 AM