मुंबई : एप्रिल अखेरीस मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे शहर, उपनगरांच्या एकूण रुग्णसंख्येत ४० टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ६० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे शहरातील संसर्गाचा वाढता धोका कायम असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य शासनाला अधिक कंबर कसावी लागणार आहे.कोरोना (कोविड-१९) विषाणूची बाधा झाल्यानंतर साधारण ५-६ दिवसांत ताप येतो. तसेच सर्दी, खोकला ही लक्षणेही दिसतात. जास्तीत जास्त १५ दिवसांच्या काळात ही लक्षणे दिसू शकतात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असते त्यांच्यात अशी लक्षणे दिसून येत नाहीत. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली असता कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे उघड झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येत आहे. परिणामी, शहर, उपनगरातील चाचण्यांची संख्याही मागील काही दिवसांत वाढविण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुले संवेदनशील घटकांमध्ये येत असल्याने त्यांची पालिका प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा बहुतांश व्यक्तींना अतिशय अल्प स्वरूपाचा आजार होतो. काही व्यक्ती संसर्गाच्या वाहक असू शकतात. त्या व्यक्तींना असिम्प्टमॅटिक असे म्हणतात. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र तरीही त्यांनी घरगुती वा संस्थात्मक अलगीकरणात राहून खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहेत. याकरिता, मुंबईत शासकीय, पालिका व खासगी रुग्णालयांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्यात आले असून, विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.>दिवसभरात मुंबईत ४१७ रुग्णांची नोंदमुंबईतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ७ हजार ६१ झाली असून बळींचा आकडा २९०वर पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी २० मृत्यू आणि ४१७ रुग्णांची नोंद झाली. रुग्ण निदानाच्या संख्येत २७ व २८ एप्रिल रोजी प्रयोगशाळांमध्ये केलेल्या ११० चाचणी अहवालांचाही समावेश करण्यात आला आहे. शहर, उपनगरात गुरुवारी नोंद झालेल्या २० मृत्यूंपैकी १६ जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील १४ पुरुष, तर सहा महिला आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ जणांचे वय ६०हून अधिक होते. तर उर्वरित १२ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते. दिवसभरात ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर मुंबईतील १,४७२ जण कोरोनामुक्त झाले.
CoronaVirus News in Mumbai: मुंबईतील ४० टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 5:14 AM