मुंबई : व्यस्त विमानतळांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई विमानतळाने कोरोना प्रतिबंधक लसींच्या वाहतुकीत आघाडी घेत, लसीकरणाला बळ देण्याचे काम केले आहे. जानेवारी ते ३० जूनपर्यंत मुंबई विमानतळाने ३१० टन लसी देश-विदेशात पोहोचवल्या असून, आतापर्यंत १ हजार २३५ टन वैद्यकीय सामग्रीची ने-आण केली आहे.कोविशिल्ड लसनिर्मितीचे केंद्र पुण्यात असल्यामुळे स्वाभाविक मुंबई विमानतळावरून त्याचे वहन करावे लागणार असल्याने प्रशासनाने त्यासाठी विशेष नियोजन केले. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या एअर कार्गो टर्मिनलची भूमिका यात महत्त्वाची होती. या टर्मिनलमध्ये आशियातील सर्वांत मोठे तापमान नियंत्रित फार्मा एक्सलेंस सेंटर आहे. शिवाय इम्पोर्ट कोल्ड झोन, स्वदेशी बनावटीचे कूलटेनर अशा सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडता आली, असे मुंबई विमानतळाकडून सांगण्यात आले.जानेवारी ते ३० जूनपर्यंत मुंबई विमानतळावरून देश-विदेशातील १३९ विमानतळांवर ३१० टन कोविड लसी रवाना करण्यात आल्या. १३९ आंतरराष्ट्रीय आणि ३९० हून अधिक देशांतर्गत विमानांद्वारे पोहोचवलेल्या या एकूण लस मात्रांची संख्या १०७.१५ दशलक्षांहून अधिक होती. केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक लस वाहतूक करण्यात आली.
CoronaVirus News: मुंबई विमानतळाने दिले लसवाहतुकीला बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:36 AM