मुंबई : लॉकडाउनमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र मालगाडी, पार्सल गाडीतून जीवनावश्यक वस्तू, औषधांची वाहतूक सुरू आहे. यातून रुग्णांसाठी घरपोच औषधांचा पुरवठा केला जात आहे. सोलापूरमधील रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णाला मध्य रेल्वेने २४ तासांच्या आत घरपोच औषधांचा पुरवठा केला. टिष्ट्वट करून मदत मागितल्यानंतर रेल्वेने ही सेवा पुरविली. त्यामुळे मध्य रेल्वे वरदान ठरत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.सोलापूरमध्ये राहणारे सुशील पाडी यांचे वडील नौदलात कर्मचारी आहेत. लॉकडाउनमुळे ते सोलापूर येथे अडकले होते. त्यांची औषधे संपली होती. रक्ताचा कर्करोग असल्याने त्यांना तातडीने औषधांची गरज होती. मध्य रेल्वेकडून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांच्या पुरवठ्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे १२ मे रोजी सुशील पाडी यांनी त्यांच्या वडिलांच्या कर्करोगासाठी अत्यंत महत्त्वाचे औषध पाहिजे असल्याने रेल्वेकडे टिष्ट्वट करून मदत मागितली. त्याची दखल घेत मुंबई विभागातील वाणिज्य निरीक्षक (पार्सल) जितेंद्र मिश्रा यांनी पार्सल लिपिक उत्तम दास यांच्या सहकार्याने पाडी यांच्या निवासस्थानी २४ तासांच्या आता औषधे पाठविली. यासाठी सुशील यांनी पुन्हा टिष्ट्वट करून भारतीय रेल्वेचे आभार मानले.अशाच प्रकारे मालगाडीला थांबा देऊन चिपळूण येथे हृदयरोग असलेल्या प्रतीक यांच्या वडिलांकडे औषध पोहोचवण्यास मदत करण्यात आली. प्रतीक यांनीही रेल्वेचे आभार मानले.गाडीने घेतला विशेष थांबा : सूरज पवार यांना वैभववाडीत राहत असलेल्या काकूसाठी तत्काळ कर्करोगाची औषधे पाठवायची होती. टाटा रुग्णालयामधून औषध मिळाल्यावर ती काकूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी टिष्ट्वटरवर पार्सल गाड्यांची चौकशी करून रेल्वेकडे मदत मागितली होती. दरम्यान, कोकण भागातून जाणारी ओखा-एर्नाकुलम पार्सल ट्रेन वैभववाडी येथे थांबा नसतानाही फक्त औषधांचे पार्सल देण्यासाठी थांबा देऊन सूरज यांच्या काकूच्या घरी औषध पोहोचवण्यात आले होते.
Coronavirus News in Mumbai : रुग्णांसाठी मध्य रेल्वे ठरली वरदान, लॉकडाउनमध्येही कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:59 AM