CoronaVirus News in Mumbai : कोरोनाचे संक्रमण मृतदेहाद्वारे होत नाही, मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:38 AM2020-05-20T02:38:42+5:302020-05-20T02:40:14+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वांद्रे कब्रस्तानमध्ये कोरोनाबधित मृतदेहाची विल्हेवाट लावू नये, अशी मागणी करणारी याचिका वांद्रे येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई : कोरोनाचे संक्रमण मृतदेहाद्वारे होत नाही. त्याशिवाय कोरोनाबधिताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रशासन सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली.
वांद्रे कब्रस्तानमध्ये कोरोनाबधित मृतदेहाची विल्हेवाट लावू नये, अशी मागणी करणारी याचिका वांद्रे येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, अशी स्थानिकांना भीती आहे. त्यामुळे वांद्रे कब्रस्तानमध्ये मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका प्रदीप गांधी व अन्य काही लोकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मृतदेहाद्वारे कोरोना संक्रमित होत नाही, असे पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी दीपक चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. केवळ साथीच्या आजार असलेल्या मृतदेहाचे फुफ्फुस शवविच्छेदन करताना अयोग्यरीतीने हाताळले गेल्यास संसर्ग होऊ शकतो, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.