CoronaVirus News in Mumbai : कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत संकेतस्थळावर , महापालिका आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:51 AM2020-05-23T06:51:48+5:302020-05-23T06:52:07+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे आयोजित एका विशेष बैठकीत आयुक्तांनी याबाबत आदेश दिले आहेत.
मुंबई : कोरोनाची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या विविध खाजगी प्रयोगशाळांनी व्यक्तींचे नमूने घेतल्यापासून २४ तासांच्या आत त्यांचा अहवाल व माहिती ‘आयसीएमआर’च्या संबंधित संकेतस्थळावर अपलोड करून त्याची प्रत महापालिकेकडे पाठविण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सर्व खाजगी प्रयोगशाळांना दिले आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे आयोजित एका विशेष बैठकीत आयुक्तांनी याबाबत आदेश दिले आहेत. या बैठकीदरम्यान खासगी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आयुक्तांनी त्यांना कोरोना कोविड १९ विषयक वैद्यकीय चाचणी अहवाल काटेकोरपणे, बिनचूकपणे व वेळेच्या वेळेत संबंधित संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल (शहर), सुरेश काकाणी (पश्चिम उपनगरे) यांच्यासह सार्वजनिक आरोग्य खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि इतर खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार संशयित व लक्षणे असलेल्या व्यक्तींचे नमुने घेतल्यापासून २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून संबंधित अहवालदेखील २४ तासांच्या आतच संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्त चहल यांनी या वेळी बजावले.
अशी घ्यावी काळजी
सर्व व खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी संबंधित संकेतस्थळावर माहिती ‘अपलोड’ करताना काही खबरदारी घ्यावी, अशी सूचना पालिकेने केली आहे. त्यानुसार रुग्ण मुंबईतील असल्यास त्याची माहिती अपलोड करताना ‘मुंबई’चा पर्याय निवडावा. इतर महापालिका क्षेत्रातील व्यक्तींची माहिती अपलोड करताना रुग्ण ज्या महापालिका क्षेत्राचा रहिवासी असेल त्यानुसार संबंधित महापालिकेच्या नावाचा पर्याय संकेतस्थळावर निवडावा लागणार आहे. या प्रयोगशाळांच्या कामकाजावर सर्व विभागाचे सहायक आयुक्त लक्ष ठेवणार आहेत.
परदेशी व्यक्तींचा १४ दिवसांत चाचणी अहवाल
परदेशातून आलेल्या व घरच्याघरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेणे व वैद्यकीय चाचणी प्रक्रिया १४ दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रक्रिया १४ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे खाजगी प्रयोगशाळांनी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.