CoronaVirus News : मुंबईत काेराेना रुग्ण दुपटीचा कालावधी ३५४ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:11 AM2020-12-21T06:11:51+5:302020-12-21T06:12:19+5:30
CoronaVirus News :मुंबईत रविवारी काेराेनाचे २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २ लाख ८६,८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मुंबई : मुंबईत काेराेना रुग्ण बरे होण्याचा कालावधी ३५४ दिवसांवर पोहोचला आहे, प्रशासनासह सामान्य मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. १३ ते १९ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचे प्रमाण ०.२१ टक्के आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मुंबईत रविवारी काेराेनाचे २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २ लाख ८६,८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात काेराेनाच्या ५८६ रुग्णांचे निदान झाले असून, ११ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार १० वर पोहोचली, तर मृतांचा आकडा १०,९९६ आहे. रविवारी मृत्यू झालेल्या ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यात १० पुरुष व १ महिला हाेती. ९ जणांचे वय ६० वर्षांवर होते, तर उर्वरित ४० ते ६० वयोगटांतील हाेते.
चाळ व झोपडपट्टीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २६१ असून सक्रिय सीलबंद इमारतींची ३,१५४ आहेत. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २,७२० सहवासितांचा शोध घेतला आहे.