मुंबई : आई-वडील, आजी- आजोबा पॉझिटिव्ह असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र एक वर्षाच्या तान्हुलीला मात्र कोरोनाची लागण झालेली नाही. तिची आई कोरोनामुक्त होऊन नक्कीच परतेल पण तोवर आई बनून तिचा सांभाळ एक शिवसैनिक महिला करीतआहे.आधी पत्रकार आणि आता वकील व युवा सेनेचे पदाधिकारी असलेले जयेश वाणी यांना कॅनडात राहणाऱ्या पूर्वाश्रमीच्या पत्रकार मैत्रिणीचा (दिप्ती बर्वे) फोन आला आणि तिने ठाण्याच्या एका अपार्टमेंटमध्ये घरातील चौघांना कोरोना झाला आहे. त्या कुटुंबातील एक वर्षाच्या बालिकेस सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले. वाणी यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार युवासेनेचे विस्तारक राहुल लोंढे मदतीला धावले. मदत मिळावी म्हणून मुलीच्या नातेवाईकांनीआधीच ट्विट केले होते. शिंदे यांनी १६ मे रोजी त्या तान्हुलीची टेस्ट केली. रविवारी सकाळी अहवाल निगेटिव्ह आला.शिंदे यांनी त्या मुलीच्या राहण्याची व्यवस्था एका मोठ्या हॉटेलमध्ये केली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी रीना मुदलियार यांनी त्यांना दोन मुलगे असतानाही त्या बालिकेचे पालकत्व स्वीकारले. तिच्या पालकांपैकी कुणीतरी बरं होत नाही तोपर्यंत रीनाताई तिच्याबरोबर राहणार आहेत. त्या बालिकेला ‘आया’ नव्हे तर एकप्रकारे आईच मिळाली आहे!
CoronaVirus News in Mumbai : महिला शिवसैनिक बनली ‘तिची’ आई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:59 AM