CoronaVirus News in Mumbai : मुंबईकरांनो; घरी राहा, सुरक्षित राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:50 AM2020-05-18T07:50:02+5:302020-05-18T07:50:10+5:30
एकीकडे मुंबई महापालिका, प्रशासन कोरोनाला हरविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न करत असताना नागरिक मात्र लॉकडाउनची ऐशीतैशी करत आहेत.
मुंबई : वरळी, धारावी, कुर्ला, दहिसरसह मुंबईतल्या बहुतांश भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी मुंबई महापालिका धारावी आणि वरळीसह ठिकठिकाणी विशेष प्रयत्न करत आहेत. कुर्ला, भायखळा, मानखुर्द, चेंबूर या ठिकाणांसह झोपड्या, चाळी असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता तर लॉकडाउनचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. एकीकडे मुंबई महापालिका, प्रशासन कोरोनाला हरविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न करत असताना नागरिक मात्र लॉकडाउनची ऐशीतैशी करत आहेत. परिणामी सेवा सुविधा मिळत असताना, आरोग्याच्या सेवा उपलब्ध असताना नियम पायदळी तुडवू नका. घराबाहेर पडू नका. घरी राहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील ताण हलका करण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने सीसीसी-१ आणि सीसीसी-२ व्यवस्थेची उभारणी वेगाने करण्यात येत आहे. कोरोना सीसीसी-१ची क्षमता वाढवून २२ हजार ९४१ बेडची करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना संशयित रुग्ण व नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यासाठी ही सोय आहे. तसेच कोरोना काळजी केंद्र ज्याला आपण सीसीसी-२ व्यवस्था म्हणतो त्याची क्षमताही ३४ हजार ३२९ बेड इतकी करण्यात आली आहे. टी विभागातील मिठानगर शाळेत दहा अतिदक्षता बेड (कोरोना आयसीयू) उपलब्ध करून देण्यात आले आहे. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया येथे सत्तर अतिदक्षता बेड (कोरोना आयसीयू) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये चाळीस मॉड्युलर व तीस मोबाइल अतिदक्षता बेड (कोरोना आयसीयू) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे एक हजार बेडची, तसेच गोरेगावातील नेस्को मैदानावर १२४० बेडची क्षमता असणारी सीसीसी-२ची व्यवस्था उभारली जात आहे. या ठिकाणी आॅक्सिजन व मोबाइल अतिदक्षता युनिट (आयसीयू युनिट) तयार केले जात आहे. कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी ७ हजार ५०० बेड तयार केले आहेत.
मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने यांच्यासह खासगी नर्सिंग होममध्ये कोविड आजाराव्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार घेता यावेत, म्हणून सुमारे ७ हजार ५००पेक्षा अधिक खाटांसह आवश्यक त्या सर्व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयामध्ये १ हजार २७८, परळच्या केईएम रुग्णालयामध्ये १ हजार ७११ आणि जुहू-विलेपार्लेच्या डॉ. कूपर रुग्णालयामध्ये ५५० अशा एकूण ३ हजार ५३९ खाटा नॉनकोविड म्हणजे कोरोना वगळता इतर आजारांवर वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. महानगरपालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ७६ खाटा नॉनकोविड आहेत. २७ मॅटर्निटी होम म्हणजे प्रसूतिगृह मिळून ८९९ खाटा आहेत. या सर्व खाटांची बेरीज ही ७ हजार ५१४ इतकी आहे. मुंबईभर असलेल्या एकूण १८७ डिस्पेन्सरी म्हणजे महानगरपालिकेचे दवाखाने आणि १ हजार ४१६ खासगी नर्सिंग होमही कोविड वगळता इतर उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी इतर आजारांवरील उपचार, सेवासुविधांबाबत चिंता करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आॅक्सिजनचे प्रमाण आॅक्सिमीटरने तपासा
१आगामी पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यातील नियोजनाच्या दृष्टिकोनातून जागेची उपलब्धता असावी या अनुषंगाने नुकतेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली. या व्यतिरिक्त महापौरांनी मुंबईतल्या उर्वरित आरोग्य यंत्रणेचीही पाहणी केली.
२वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे रचना करण्यात येईल? याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच स्टेडियमच्या आत व बाहेर किती टॉयलेट व शौचालय असावीत? याची नियोजनात्मक चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या ए विभागाच्या वतीने वानखेडेच्या प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून, कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३जी/दक्षिण विभाग व वाडिया रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य शिबिराला महापौरांनी भेट दिली. यामध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे लक्षण असणाऱ्यांनी योग्य ती तपासणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण आॅक्सिमीटरने तपासणीची सूचना महापौरांनी केली.
सीलबंद इमारती
- एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला सीलबंद म्हणून घोषित करण्यात येईल.
- हे करताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग सीलबंद म्हणून घोषित करण्यात येईल.
- अशा इमारतीच्या / सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी राबवायच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येईल.
प्रशासन सज्ज
मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह भविष्यात हे संकट आणखी गहिरे झाले तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिका तत्पर आहे. मात्र हे संकट आणखी गडद होणार नाही.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होतील आणि कोरोनाचा प्रसार होणार नाही याकरिता मुंबई महापालिका वेगाने काम करते आहे. विशेषत: आरोग्याबाबत मुंबईकरांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
मात्र इतक्या मोठ्या संख्येने जरी महापालिकेने व्यवस्था केली असली तरी लोकांनी व्यवस्था आहे म्हणून घराबाहेर निघणे बरोबर नाही. तरी नागरिकांनी घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे.