Join us

CoronaVirus News in Mumbai: लीलावती रुग्णालयात पहिल्या ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 5:16 AM

पालिकेच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालिका या उपचार पद्धतीबाबत पुनर्विचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई : वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले असताना, गुरुवारी संबंधित ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिकेच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालिका या उपचार पद्धतीबाबत पुनर्विचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लीलावती रुग्णालयात संबंधित ५२ वर्षीय रुग्णाला सर्दी, ताप आणि फुप्फुसाचा संसर्ग होऊ लागल्याने २० एप्रिल रोजी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय लीलावती रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडून परवानगी मागितल्यानंतर शनिवारी नायर रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या दाता रुग्णाच्या रक्तातून अ‍ॅण्टिबॉडिज् मिळवून प्लाझ्मा तंत्रज्ञानाने उपचार करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.>तज्ज्ञ डॉक्टरांची रुग्णालयाशी चर्चा : लीलावती रुग्णालय प्रशासनाच्या मागणीनंतरच संबंधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी देण्यात आली होती. यानुसार शनिवारी प्लाझ्मा थेरपी करण्यातही आली. या थेरपीनंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती प्रशासनाकडून पालिकेला देण्यात आली होती. मात्र त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयाशी चर्चा करीत आहेत. त्यांच्याकडून मृत्यूचा अहवाल मागविल्याची माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस