Coronavirus News: मुंबई पोर्ट ट्रस्टकडून ‘कोरोना’बाबत प्रवासी, मालवाहू जहाजांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:42 AM2020-02-03T04:42:37+5:302020-02-03T06:25:02+5:30
पोर्ट ट्रस्टच्या परिपत्रकानुसार, मुंबईत दाखल होणाऱ्या जहाजाचा गेल्या ३० दिवसांत कोणत्या देशांतून प्रवास झाला आहे
मुंबई : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचे रुग्ण समुद्रीमार्गे मुंबईत दाखल होऊ नयेत व जे प्रवासी येतील त्यांच्यामध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण असल्यास त्यांची माहिती मिळावी यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मुंबईत दाखल होणारी प्रवासी जहाजे व मालवाहतूक करणारी जहाजे यांच्यासाठी मार्गदर्शक उपाययोजना परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच अद्याप अशा प्रकारचा कोणताही संशयित रुग्ण आढळला नसल्याचे पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात आले.
पोर्ट ट्रस्टच्या परिपत्रकानुसार, मुंबईत दाखल होणाऱ्या जहाजाचा गेल्या ३० दिवसांत कोणत्या देशांतून प्रवास झाला आहे, त्याची माहिती जहाजाच्या कॅप्टनने जहाज मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोर्ट प्रशासनाला द्यावी लागणार आहे. तसेच जहाजामध्ये एखादा प्रवासी आजारी असल्यास त्याची आगावू माहिती द्यावी. कोरोनाग्रस्त भागातील एखादा प्रवासी किंवा कर्मचारी जहाजातून प्रवास करत असल्यास किंवा कोरोनाग्रस्त भागातून जहाज आले असल्यास त्याची माहिती द्यावी.
जर असा संशयास्पद प्रवासी, कर्मचारी आढळल्यास त्याची माहिती त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. त्यानंतर वैद्यकीय पथक त्याची तपासणी करेल. जर असा प्रवासी आढळल्यास त्यांना बंदरावर उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही व अशा रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील आयसोलेटेड कक्षामध्ये उपचारासाठी हलवण्यात येईल, असे या मार्गदर्शक उपाययोजनेत नमूद करण्यात आले आहे.
जहाजावरील ज्या कर्मचाºयांनी गेल्या एका महिन्यात चीनचा प्रवास केला आहे त्यांनादेखील बंदरावर उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. चीनहून येणाºया जहाजातील कर्मचाºयांना, चिनी कर्मचाºयांना बंदरावर उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र चीनहून आलेल्या इतर जहाजांमध्ये चिनीव्यतिरिक्त इतर कर्मचारी असल्यास त्यांची थर्मल स्कॅनिंग केली जाईल व सर्व अहवाल तपासल्यानंतर त्यांना बंदरावर उतरण्याची परवानगी दिली जाईल, असे परिपत्रक काढण्यात आले आहे.
प्रवाशांसह कर्मचाºयांचे थर्मल स्कॅनिंग
परदेशातून येणाºया प्रवासी व कर्मचाºयांचे थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी थर्मल स्कॅनर्स राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवासी व कर्मचाºयाची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. जहाजावर जाणाºया कर्मचारी, कस्टमचे कर्मचारी, पायलट सर्वांना मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.