CoronaVirus News in Mumbai :‘वानखेडेत क्वारंटाइन केंद्र उभारण्यावर पुनर्विचार करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:45 AM2020-05-18T04:45:35+5:302020-05-18T06:49:26+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates :असोसिएशनने म्हटले आहे की, जुन्या रहिवाशी भागाच्या मध्यभागी वानखेडे स्टेडियम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहतात.
मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी ताब्यात द्यावे, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली आहे. मात्र वानखेडे मैदानात क्वारंटाइन कक्ष उभारण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी मरिन ड्राईव्ह रेसिडेंट असोसिएशनने केली आहे. याबाबतचे पत्र मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, जुन्या रहिवाशी भागाच्या मध्यभागी वानखेडे स्टेडियम आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना अगोदरच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा परिसर आता ग्रीन झोनमध्ये आहे. आम्ही कठोरपणे लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले आहे. वानखेडे मैदानात क्वारंटाइन केंद्रासाठी दिल्यास आजार आमच्या दारात येईल असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
ब्रेबॉर्न मैदानात क्वारंटाइन केंद्र उभारा
मुंबईची वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडेबरोबर ब्रेबॉर्न मैदानाचा क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा, असे टिष्ट्वट संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या टिष्ट्वटला युवासेना सेनाप्रमुख आमदार अदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, येणारा पावसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीची मैदाने आहेत, असे ठिकाण क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरता येणार नाही. ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण केलेली जमीन आहे, अशी मैदान क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरता येतील.