मुंबई : मुंबईत ११ मार्च २०२० रोजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखणे हे लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या मुंबईसाठी आव्हानच होते, आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. २० ऑक्टोबरला पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला हाेता.चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार केलेल्या उपाययाेजनांमुळे पालिकेच्या प्रयत्नांना यश येत आहे. २१ ऑक्टोबरला रुग्ण दुपटीच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठला होता. एफ-दक्षिण विभाग हा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचा २०० दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला. आता या विभागात हा कालावधी ३६२ दिवसांवर पोहोचला.बी विभाग २३२ दिवस, जी दक्षिण २३१ दिवस, ए २१२ दिवस असा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे.
यामुळे काेराेनावर नियंत्रण मिळवणे शक्यप्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर, वैद्यकीय उपचारविषयक आवश्यक कार्यवाही, शीघ्रकृती कार्यक्रमाची अभियान स्वरूपात अंमलबजावणी, फिरते दवाखाने, प्राथमिक तपासणी, चाचणीद्वारे बाधितांचा शोध, प्राणवायू पातळी तपासणे, शारीरिक तापमान तपासणे, नागरिकांना असलेल्या सहव्याधींची स्वतंत्र नोंद करून उपाययाेजना इत्यादी.
कालावधी वाढला- १० ते २१ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरून ३१ दिवसांनी वाढून १०२ दिवस इतका झाला. याच कालावधीत २४ विभागांपैकी ३ विभागांत रुग्ण दुपटीचा कालावधी १५० दिवसांपेक्षा अधिक होता. तर ११ विभागांमध्ये ताे १०० दिवसांपेक्षा अधिक होता.