मुंबई : दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सव कसा साजरा याची सर्वांनाच चिंता आहे. तसेच, या उत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन कसे करायचे, असा प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर पडला आहे. त्यामुळे मुंबईतील एका गणेशोत्सव मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचे संकट पाहता वडाळा राम मंदिर जीएसबी सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, यावर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजरा करण्यात येणार नाही, तर याऐवजी गणेशोत्सव माघ महिन्यातील २०२१ मधील गणेश चतुर्थीला साजरा करण्यात येणार आहे.
जीएसएबी वडाळा येथे ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यादरम्यान, लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी असते. कोरोनाच्या परिस्थितील अशी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक बंधने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जीएसबी वडाळा गणेशोत्सव मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंडळाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेतला.