मुंबई: मुंबईकरांसाठी सुखद बाब म्हणजे मागील पाच महिन्यांच्या संघर्षानंतर शहर उपनगरात एकूण कोरोना रुग्ण वाढीचा दर 0.97 टक्क्यांवर आला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर असून रुग्ण दुपटीचा कालावधी 72 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.
मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण 18 म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे. यातही विशेष म्हणजे, मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांपैकी 14 विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा 72 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभाग 90 दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग 100 दिवसांपेक्षा अधिक दिवसांची सरासरी राखून आहेत.
आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 83 हजार 097 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारांपेक्षाही कमी झाली आहे.
धारावीत दिवसभरात केवळ दोन रुग्णांची नोंद
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बुधवारी धारावीत फक्त कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. सध्या या ठिकाणी 83 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धारावी कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असताना दादर आणि माहिममध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी माहिम, दादर परिसरात प्रत्येकी 25 रुग्ण सापडले. तीन महिन्यांपूर्वी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट होता, मात्र धारावीतील कोरोना नियंत्रणाचे केंद्रानेही कौतुक केले. धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 2 हजार 545 वर गेला आहे. यातील 2 हजार 212 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.