मुंबई : कोरोनाची मुंबईतील स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तरीही दिवाळीत जर का मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले आणि कोरोनाचे नियम पाळले गेले नाहीत तर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी महापालिकेने गर्दी नियंत्रित व्हावी यासाठी कठोर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे यासारख्या सूचनांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध तीव्र कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, दीपावलीचे औचित्य पाहता प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. कोरोना रुग्णांना, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेता फटाके फोडण्यावरील नियंत्रणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याच्या टास्क फोर्सने गर्दीतून संसर्गाचा धोका वाढण्याचा इशारा यापूर्वी दिला आहे. त्यामुळे खरेदीसाठी होत असलेली गर्दी नियंत्रित व्हावी, फटाक्यांसंबंधी परिपत्रकाची अंमलबजावणी याविषयी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक घेतली. यात त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
पावलीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसह विविध कारणांसाठी नागरिकांची मंडया, मॉल्स यासह सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न लावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्या तिपटीने वाढविली आहे. महानगरपालिकेच्या इतर खात्यांतील अधिकारी-कर्मचारीही यासाठी नियुक्त करण्यात येत आहेत. मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि गर्दीच्या वेळा शोधून त्यानुसार गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग तैनात केला जात आहे. या सर्व उपाययोजनांमध्ये आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेतले जात आहे.