CoronaVirus News: मुंबईकरांनो! आपली जबाबदारी वेळीच ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:56 AM2020-10-05T01:56:57+5:302020-10-05T01:57:19+5:30
CoronaVirus Mumbai News: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत उदासिनता : कोरोना संकट हद्दपार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे; मार्केटिंग, ब्रँडिंग नको
- सचिन लुंगसे
मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्युदर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असले तरीही मुंबईकर ज्या पद्धतीने या मोहिमेस सहकार्य करत आहेत; ते पाहता कोरोनावर लवकर मात करणे मुश्कील असल्याचे चित्र आहे.
कारण आजही सामाजिक अंतराचे, मास्क लावण्याचे, थुंकण्याचे नियम पाळले जात नाहीत. मुंबई महापालिकेने यासाठी घालून दिलेले नियम केवळ कागदावर असून प्रत्यक्षात फिल्डवर काम करत असलेल्या स्वयंसेवकांना अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. मुळात मोहिमेची केवळ औपचारिकता सुरू असून, आता तर या मोहिमेवर टीका होऊ लागली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. परिणामी आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागेल. या कारणाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या मोहिमेनुसार, आतापर्यंत सुमारे ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के अर्थात, ७ लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
लोकसंख्येचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येपैकी १७.२३ टक्के लोकसंख्येचे म्हणजेच २४ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
ब्रँडिंग नको तर काम पाहिजे
संकल्पना उत्तम आहे. मात्र अंमलबजावणी नीट होत नाही. नियोजन होत नाही. कृती नीट होत नाही. या सगळ्याचा ताळमेळ घातला तर मोहीम नीट राबविली जाईल. प्रशासन घरापर्यंत पोहोचते का, तपासणी होते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. नाव मोठे देऊन, स्लोगन चांगले देऊन निकाल चांगला येत नाही. नाव मोठे दिले म्हणजे काम चांगले होते, असे होत नाही. आणि या मोहिमेत जे लोक चांगले काम करत आहेत त्यांना पुरेसे आवश्यक मानधन देणे गरजेचे आहे. गरीब महिला मोहिमेत काम करत असतील तर त्यांना मानधन नीट दिले पाहिजे. असे केले तर त्याही नीट काम करतील. एकंदर मोहिमेचे केवळ मार्केटिंग किंवा ब्रँडिंग नको तर कामसुद्धा झाले पाहिजे.
- संजय तुर्डे, नगरसेवक, मनसे
लोकांनी सहकार्य केले पाहिजे
काम सुरू आहे. झोपड्यांत राहणारे लोक प्रतिसाद देत आहेत. मात्र इमारतीमध्ये राहणारे लोक प्रतिसाद देत नाहीत. तपासणी करायला कोणी तयार नाही आणि मुंबई महापालिकेचे कामगार तरी किती काम करणार, हा प्रश्न आहे. कोविडमध्ये काम करायचे. विभागात फिरायचे म्हणजे कामाला वाहून घेतले पाहिजे. महापालिका काम करत आहे, पण झोपड्यांप्रमाणे इमारतींमधील लोकांनी सहकार्य केले पाहिजे.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते,
मुंबई महापालिका
महापालिकेच्या स्वयंसेवकांचा चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे.
वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सहव्याधींची माहिती घेतली जात आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व आॅक्सिजन पातळीही नोंदवून घेण्यात येत आहे.
कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अंमलात आणाव्यात, याचीही माहिती दिली जात आहे.
माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रकसुद्धा प्रत्येक घरी देण्यात येत आहे.
आदेश...
सर्वेक्षण योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करा.
सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील दैनंदिन चाचण्यांची संख्या नियोजनपूर्वक वाढवा.
विनामास्क वावरणाºया नागरिकांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई करा.
इमारतीमध्ये कार्यरत असणारे सुरक्षारक्षक, लिफ्टमन, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करा.
पथकात कोण...
एक शासकीय कर्मचारी
आशा वर्कर
दोन स्थानिक स्वयंसेवक
त्रिसूत्री
नागरिकांनी आपसात अंतर राखणे
फेसमास्कचा वापर करणे
वारंवार हात धुणे