मुंबई : गेल्या सात महिन्यांत कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर पहिल्यांदाच मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १४ टक्क्यांच्या खाली आहे. १३ डिसेंबर रोजी मुंबईत पॉझिटिव्हिटी दर १३.८९ टक्के असल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १६.०७ टक्के होता. मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३०० दिवसांच्या वर गेला आहे.मुंबईत सध्या दिवसाला १५ हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या अँटिजन चाचण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याविषयी, सायन रुग्णालयाच्या डॉ. सीमा बनसोडे यांनी सांगितले, सध्या सामान्य नागरिकांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर ऱाखणे, स्वच्छता राखणे यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, शिवाय आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याविषयी खबरदारी घेतली जात आहे. सध्या शहर उपनगरातील ७० टक्के खाटा रिक्त असून, एकूण १६ हजार ५९३ खाटांपैकी ४ हजार ७०५ खाटांवर रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले, दिवाळीनंतर संख्येत वाढ झाली नसल्याने बेफिकिर होऊनही चालणार नाही. यंत्रणांनी आणि सर्वसामान्यांनीही खबरदारी बाळगली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
CoronaVirus News: मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १४ टक्क्यांच्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 1:58 AM