Join us

CoronaVirus News: नायर संपूर्णतः कोविड रुग्णालय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 2:04 AM

पालिकेच्या इतर मुख्य रुग्णालयांप्रमाणे काही भाग कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी खुला ठेवण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पालिकेकडे केली होती, ही निवासी डॉक्टरांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

मुंबई : नायर रुग्णालय हे केवळ पालिकेचे रुग्णालय नसून, वैद्यकीय महाविद्यालयही आहे. तेव्हा कोरोनासाठी पूर्णपणे राखीव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका. पालिकेच्या इतर मुख्य रुग्णालयांप्रमाणे काही भाग कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी खुला ठेवण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पालिकेकडे केली होती, ही निवासी डॉक्टरांची मागणी मान्य करण्यात आली आहे.एक हजार खाटांच्या या रुग्णालयाने जवळपास गेले वर्षभर रुग्णांना सेवा दिली; परंतु यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना वर्षभरात त्यांनी प्रवेश घेतलेल्या विषयाचे वैद्यकीय ज्ञान, शल्यचिकित्सेचा अनुभव मिळूच शकला नाही. तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी एक वर्ष पूर्णपणे कोरोनात काम करून आता थेट परीक्षा देत आहेत. आता पुन्हा कोरोना रुग्णालय घोषित केल्यास निवासी डॉक्टरांचे दुसरे वर्षही वाया जाईल, अशा रीतीने कोणताही अनुभव आणि ज्ञान न घेतलेले विद्यार्थी डॉक्टर म्हणून कशी सेवा देतील, असा प्रश्न मार्ड संघटनेने पालिकेपुढे उपस्थित केला होता.या पार्श्वभूमीवर, नायरच्या निवासी डॉक्टरांची पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासमवेत बैठक झाली असून, पालिकेने मागण्या मान्य केल्याची माहिती नायरच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना दिलासा मिळाला असून, रुग्णालयात कोविडसह नाॅनकोविड रुग्णांवर उपचार होणार आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या