Join us

CoronaVirus News: नाका कामगारांची कामाच्या शोधात पुन्हा नाक्यांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 1:47 AM

लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध न झाल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. यातील अनेक नाका कामगार आपापल्या राज्यात निघून गेले.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा जवळपास सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला. हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारांनाही याची झळ बसली. परंतु आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पुन्हा एकदा नाका कामगार कामाच्या शोधात नाक्यांवर गर्दी करू लागले आहेत. पूर्व उपनगरातील चेंबूर नाका, मानखुर्द, विक्रोळी पार्कसाइट, घाटकोपर राजावाडी, वाशीनाका व कुर्ला सिग्नल येथील नाक्यांवर पुन्हा एकदा नाका कामगार काम शोधू लागले आहेत.लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध न झाल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. यातील अनेक नाका कामगार आपापल्या राज्यात निघून गेले.मुंबईत पुन्हा एकदा बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांना नाका कामगारांची गरज भासत आहे. दिवसाकाठी तीनशे ते चारशे रूपये मिळून निदान आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल यासाठी मुंबईत स्थायिक असलेले नाका कामगार पुन्हा एकदा नाक्यांवर येऊ लागले आहेत.खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या काम करून पगार मिळत होता. परंतु आमचे हातावर पोट असल्याने आमच्या रोजगाराचे साधन ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात शहरातली कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे सुरक्षेचे सर्व नियम पाळून आम्ही आमच्या कामास सुरुवात केली आहे, असे चेंबूर नाका येथील नाका कामगार सुरेश हजारे यांनी सांगितले.