आर्थिक मदत न करता मोदी सरकार राज्य सरकारांवर दादागिरी नेमाने करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:04 AM2020-05-12T11:04:23+5:302020-05-12T11:15:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन हा उपाय नाही, ते केवळ पॉज बटण आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत का सांगताहेत त्याचा विचार करा असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र मोदी सरकार कोणतीही आर्थिक मदत न करता अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांना दादागिरी नेमाने करत असल्याची टीका मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड फेसबुक पोस्टद्वारे म्हणाले की, कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारं करत आहेत ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या. शिवाय सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून पंतप्रधानांनी राज्य सरकारांच्या प्रयत्नांना फक्त खीळ घालायचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आदी मुख्यमंत्र्यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं जे भक्कम जाळं निर्माण झालं त्यामुळेच आज आपला संघर्ष सुरू आहे. कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांना दादागिरी मात्र नेमाने करत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच आर्थिक अराजक निर्माण करायचं, संघराज्य पद्धतीचा साचा ढिला करायचा, आणि अलगद संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणायची, हा डाव आता दिसू लागला आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही, ते केवळ पॉज बटण आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत का सांगताहेत त्याचा विचार करा असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच कोरोनाची समस्या गंभीर होऊ शकते हा इशारा त्यांनी १२ फेब्रुवारीला दिला होता. पण १५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता, हे आठवणीत असू द्या, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टोला देखील लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, कोरोनामुळे उच्च मध्यमवर्गाला आता कळलं असावं की, आपला जीव सुरक्षित राहण्यासाठी गोरगरिबांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. असा भयानक आजार जात, पात, धर्म, लिंग आणि आर्थिक स्तर याची चौकशी करून येत नसतो. आधीपासूनच परमार्थात स्वार्थ पाहिला की अशी दरवाजे बंद करून भीतीच्या छायेत जगायची वेळ येत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
उच्चभ्रूंच्या पंचतारांकित गगनचुंबी सोसायट्यांमध्ये सध्या शुकशुकाट आहे. कोणीही घराबाहेर पडत नाही. बाहेरून येणारे भाजीवाले दूधवाले, स्वच्छता कर्मचारी, या सर्वांची प्रवेशद्वारावर काटेकोर चाचणी केली जाते. त्यांना कोणाला ताप नाही ना, सर्दी खोकला नाही ना, हे तपासलं जातं. त्यासाठी सुरक्षा रक्षक सोसायट्यांमध्येच राहतात. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था सोसायट्यांनी स्वखर्चाने केली आहे. या सुरक्षायक्षकांकडे थर्मल गन, हातमोजे, तोंडाला मास्क स्यानिटायझर अशी सामग्री मुबलक प्रमाणात देण्यात आलेली आहे. खुद्द सोसायटीत राहणारे, पण अत्यावश्यक सेवेत असलेले जे लोक कामासाठी बाहेर जातात त्यांनाही घरी परत येताना या सगळ्या चाचण्या देऊनच सोसायटी प्रवेश मिळतो. मग ते डॉक्टर्स असोत की बँकर्स. नियम म्हणजे नियम. तो सर्वांना समान लागू. आता त्यांची जर ही अवस्था असेल, तर चुकूनमाकून येणारी कामवाली बाई किंवा एखाद्याच्या गाडीचा ड्रायव्हर यांची तर बातच सोडा. सोसायटीतला एखादा रहिवासी पंधरा-वीस मिनिटात जवळच्या दुकानातून वाणसामान जरी घेऊन आला तरी त्याची या चाचण्यांमधून सुटका नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा