CoronaVirus News: बॉडी बॅग खरेदी निविदा नव्याने मागवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 01:12 AM2020-06-14T01:12:29+5:302020-06-14T01:12:40+5:30

भाजप नेत्यांकडून घोटाळ्याचा आरोप, चौकशीची मागणी

CoronaVirus News: New tender for purchase of body bags | CoronaVirus News: बॉडी बॅग खरेदी निविदा नव्याने मागवणार

CoronaVirus News: बॉडी बॅग खरेदी निविदा नव्याने मागवणार

googlenewsNext

मुंबई : कोरोनाबाधित मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोप होत असताना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने आणखी बॉडी बॅग निविदा प्रक्रिया रद्द केली. तसेच नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत. परंतु, या प्रकरणात संशय व्यक्त करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह बंदिस्त करणे आवश्यक असते. यासाठी बॉडी बॅग खरेदीकरिता २३ मे २०२० रोजी निविदा काढण्यात आल्या. मात्र या एका बॅगची किंमत बाजारात ६०० ते १२०० रुपये असताना महापालिका त्यासाठी सहा हजार ७१९ रुपये मोजत असल्याचा आरोप होऊ लागला. सोशल मीडियावर हा विषय गाजल्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र निविदा तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने रद्द करून नव्याने निविदा काढण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. 

मात्र भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी या प्रकरणात घोटाळ्याचा संशय व्यक्त केला आहे. निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेलाही यासाठी जबाबदार धरून त्यांना जाब विचारला आहे. दरम्यान, बॉडी बॅग या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असे पालिकेने ठामपणे सांगितले आहे.

बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी संकेतस्थळामार्फत खुल्या पद्धतीने तीन वेळा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी वेळोवेळीच्या गरजांनुसार आतापर्यंत २ हजार २०० बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या 'पॅनल'द्वारेही याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली होती.
निवड करण्यात आलेल्या उत्पादनाची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर किंमत ७ हजार ८०० एवढी आहे.

केंद्र शासनाच्या निर्धारित निकषांनुसार पालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग या ‘स्पेशलाइज’ पद्धतीच्या आहेत. त्या सुरक्षित पद्धतीने तयार केलेल्या आहेत.

Web Title: CoronaVirus News: New tender for purchase of body bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.