मुंबई : मागील काही दिवसांत दररोजच्या कोविडबाधित रुग्णांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. मात्र आता घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती असते. त्यामुळे पुढील चार दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात रुग्णसंख्येतील घट कायम राहिल्यास तिसरी लाट ओसरल्याचे म्हणता येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मंगळवारी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार २१ डिसेंबरपासून सुरू झाला. बाधित रुग्णांची संख्या दररोज २० टक्क्यांनी वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. मात्र मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्येत घसरण सुरू झाली आहे. मंगळवारी बाधित रुग्णांचा आकडा सहा हजारांवर आला आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. मुंबईत डेल्टा डेरिव्हेटिव्ह व्हेरिएंटचे रुग्ण अधिक होते. मात्र तिसऱ्या लाटेपासून त्यात घट होऊन ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ झाली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाज राज्याच्या टास्क फोर्सने व्यक्त केला होता. मात्र मुंबईत रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी पुढील दोन ते तीन दिवस रुग्णसंख्येचा आढावा घ्यावा लागेल. रुग्णसंख्या अशीच कमी होत राहिल्यास मुंबईमधून तिसरी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट होईल, असे काकाणी यांनी सांगितले. ...तर शाळा सुरू करण्याची शिफारस करूमुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. पहिल्या दोन लाटांपेक्षा तिसऱ्या लाटेत जास्त रुग्ण आढळून आले. यामुळे राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या आणखी कमी होऊन ती आटोक्यात आल्यास मुंबईमधील परिस्थितीची माहिती राज्याच्या टास्क फोर्स आणि राज्य सरकारला देऊन शाळा सुरू करण्याबाबत शिफारस केली जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र बूथमुंबईमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. परंतु, सुरुवातीला नऊ केंद्रांवरच मुलांचे लसीकरण सुरू होते. आता ३५० केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र बूथ असणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय आणि वस्तीपातळीवर शिबिर आयोजित करून लसीकरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट; पुढील चार दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:46 AM