CoronaVirus News: कोरोना मुक्तीकडे वाटचाल; धारावीत एकअंकी रुग्णसंख्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:51 AM2021-08-09T06:51:30+5:302021-08-09T06:51:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा एक आकडी नोंदविण्यात येत आहे. कित्येक दिवस ही नोंद शून्यदेखील नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर नियंत्रण मिळविले जात आहे. धारावीतदेखील कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बऱ्यापैकी यश येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा एक आकडी नोंदविण्यात येत आहे. कित्येक दिवस ही नोंद शून्यदेखील नोंदविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा हा परिणाम आहे. लसीकरणाचाही फायदा होत आहे.
रविवारी धारावीत शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दादर येथे दोन रुग्णांची नोंद झाली आहे. माहीम येथे ४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दादर येथील एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ९२९ आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०० आहे, तर ९ हजार ६४५ एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ९९० असून, सक्रिय रुग्ण ३५ आहेत, तर ६ हजार ५९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. माहीम येथील एकूण रुग्णसंख्या १० हजार २४६ एवढी असून, २०६ सक्रिय रुग्ण आहेत, तर ९ हजार ९७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेसह खासगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थेकडून राबविण्यात येत असलेले आरोग्यविषयक उपक्रम आणि लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याचा दावा केला जात असून, येथील लसीकरणावर सातत्याने भर दिला जात आहे.