मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत वाढत असला तरी सुदैवाने आणखी नव्या स्ट्रेनचे रुग्ण यात नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, तरीही महापालिकेने ९० रुग्णांचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठविले आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्या स्ट्रेनबाबत खातरजमा होईल.
सावधगिरी म्हणून जिनोम सिक्वेन्ससाठी पुण्याच्या संस्थेकडे ९० रुग्णांच्या चाचणीचे अहवाल पाठविण्यात आले आहेत. मुंबईत नवीन स्ट्रेन नाही याला मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुजोरा दिला. ५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनवरून आलेल्या १५८३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती. यापैकी बाधित प्रवाशांमध्ये ब्रिटनमधील नवा स्ट्रेन सापडला होता. मात्र, या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते कोरोनामुक्त झाले होते.