सुदैवाने राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा (स्ट्रेन) एकही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही. युरोप खंडातील बहुतांश देश तिसऱ्या लॉकडाऊनवर गेले आहेत. तेथे कठोर लॉकडाऊन केले जात आहे. आपण त्या स्टेजवर जाऊ नये, असे राज्यातील जनतेला वाटत असेल तर स्वयंशिस्त पाळावी लागेल, आरोग्य यंत्रणेला काम करायला एक मर्यादा राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
टोपे म्हणाले, पुण्यातील एनआयव्ही येथे ४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, राज्यात ‘यूके’तील स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण या स्ट्रेनचा संसर्गाचा वेग ७० पटीने अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. लोकांनी शिस्त पाळली तर यंत्रणेवर ताण पडणार नाही.