CoronaVirus News: आता होमिओपॅथीमध्येही कोरोनावर ‘नोसोड’, हाफकिन संस्थेमध्ये झाले संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:26 AM2020-08-18T05:26:47+5:302020-08-18T05:27:37+5:30
हाफकिन संस्थेच्या साहाय्याने लाइफफोर्स होमिओपॅथीचे संचालक, ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ व संशोधक डॉ. राजेश शाह यांच्या नेतृत्वाखाली ही संशोधन प्रक्रिया सुरू आहे.
स्नेहा मोरे
मुंबई : सर्व स्तरांवर अॅलोपॅथी उपचार पद्धतीत कोरोनावर लसीविषयी संशोधन प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असतानाच होमिओपॅथी उपचार पद्धतीतही कोरोनावर ‘नोसोड’ (लस) औषधाचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. परळ येथील हाफकिन संस्थेमध्ये नोसोडचे मार्च महिन्यापासून संशोधन सुरू आहे. हाफकिन संस्थेच्या साहाय्याने लाइफफोर्स होमिओपॅथीचे संचालक, ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ व संशोधक डॉ. राजेश शाह यांच्या नेतृत्वाखाली ही संशोधन प्रक्रिया सुरू आहे.
याविषयी माहिती देताना डॉ. शाह यांनी सांगितले, वैद्यकशास्त्राच्या होमिओपॅथी पद्धतीत वेगवेगळ्या विषाणू तसेच जीवाणूंपासून औषधे तयार करण्याची पद्धत २०० वर्षे जुनी आहे. लसीसारख्या असलेल्या या औषधांना ‘नोसोड’ म्हणतात. जीवाणूंपासून बनवलेली होमिओपॅथी औषधे इतर जीवाणूंपासून होत असलेल्या रोगांवरही प्रभावी ठरतात. या तत्त्वावर भारतीय बनावटीचे हे कोरोनावरील पहिले होमिओपॅथी नोसोड आहे.
नोसोड निर्मिती प्रक्रिया लॉकडाऊनपूर्वी १५ मार्चपासून सुरू झाली असून २२ मे रोजी हे औषध तयार झाले. आता मानवी चाचणी प्रयोग सुरू आहे.
औषधाच्या उपयुक्ततेविषयी डॉ. शाह म्हणाले की, यापूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या नोसोडचा विविध आजारांसाठी वापर अत्यंत उपयुक्त ठरला आहे, त्याप्रमाणे हे नोसोडही लाभदायी ठरेल असा विश्वास असून त्या दृष्टीने सातत्याने अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. नोसोडच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्तीची (इम्युनिटी) निर्मिती करणे आणि टिकवणे यात मदत होणार आहे.
तसेच कोरोनानंतर होणाऱ्या आजारांवरही हे परिणामकारक ठरू शकते. नोसोडचे कोणतेही दुष्परिणाम नसून, सर्वांकरिता हे औषध अत्यंत सुरक्षित आहे. सध्या मानवी चाचणी प्रयोग सुरू आहे, त्यात १० व्यक्तींना हे औषध देण्यात आले असून यात कोणताही धोका नसल्याचे निरीक्षणात आढळून आले. या प्रक्रियेत औषध सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. याकरिता संस्थेने विशेष समिती गठित केली असून त्यात राज्यातील होमिओपॅथी शाखेतील विशेषज्ञांचा समावेश आहे. या समितीत राज्याच्या आयुष टास्क फोर्समधील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांचाही सहभाग आहे.
>आयसीएमआरकडून मान्यता मिळविण्याची प्रतीक्षा
केंद्रस्तरावर अॅलोपॅथी औषध निर्मिती व संशोधन प्रक्रियेचा मार्ग सुकर आहे. परंतु होमिओपॅथी नोसोडचे संशोधन करण्यासाठी पारदर्शी प्रक्रिया नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अद्ययावत करणे गरेजेचे आहे. या प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करून नवी प्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे मत राज्याच्या आयुष टास्क फोर्समधील ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांनी नमूद केले. शिवाय, हे बदल केंद्रीय आरोग्य विभागाने प्रकर्षाने करणे गरजेचे आहे. यामुळे कोरोनावरील नोसोड सर्वसामान्यांसाठी उपलब्धतेचा मार्गही मोकळा होईल आणि हे औषध कमी किमतीत उपलब्ध होईल, ही बाब डॉ. पाटील यांनी नमूद केली. त्याकरिता या औषधाला भारतीय संशोधन वैद्यकीय परिषद संस्थेकडून (आयसीएमआर) मान्यता मिळणे महत्त्वाचे आहे, या प्रतीक्षेत असल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले.
>आयुषकडून संशोधनाला
मिळाले प्रोत्साहन
एप्रिल महिन्यात या संशोधन प्रक्रियेला मान्यता मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. आयुष मंत्रालयाकडे होमिओपॅथी संशोधनासाठी जवळपास ८०० प्रस्ताव आले होते, मात्र त्यात केवळ हाफकिन संस्थेच्या साहाय्याने सुरू असलेल्या डॉ. राजेश शाह यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. या मान्यतेमुळेही नोसोड संशोधनाला प्रोत्साहन मिळाल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले.