CoronaVirus News : दीड लाख मजुरांचा ११ हजार लाल परींतून सीमेपर्यंत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:31 AM2020-05-17T01:31:28+5:302020-05-17T01:31:53+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : लाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी बसेसही स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे. यातील काही स्थलांतरीत मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचा ही लाभ घेतला आहे. राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचेही काम बसद्वारे केले जात आहे.
श्रमिक रेल्वे सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत १९१ रेल्वेगाड्यांतून २ लाख ४५ हजार ०६० स्थलांतरित
कामगारांना सुखरूप त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांच्या तिकिटासाठी ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून
दिला गेला आहे. महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील कामगार आणि मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची तीव्र इच्छा होती. त्यांची हीच इच्छा लक्षात घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या राज्यात परतता यावे, त्यांचे हाल होऊ नयेत
यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे
केली होती. त्यास केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता राज्याच्या विविध शहरातून परराज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी आणि कामगारांसाठी रोज २५ रेल्वे गाड्या धावत आहेत.
बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रपदेश, ओडिशा, जम्मूमध्ये राज्यातील मजूर आता या
श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून घरी परतू लागले आहेत. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य
प्रदेशच्या स्थलांतरित मजुरांची संख्या अधिक आहे.