मुंबई : कोरोनाचा प्रसार अनेक विभागांमध्ये नियंत्रणात आल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र खबरदारी म्हणून आणखी कोविड केअर केंद्र उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्र निसर्गोद्यानातील २०० रुग्णशय्येचे कोरोना केंद्र सुरू केल्यानंतर आता भायखळा पूर्व येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रीचर्डसन आणि क्रुडास या कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात एक हजार खाटांची क्षमता असलेले उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.पालिकेच्या अभियंत्यांनी अवघ्या १५ दिवसांमध्ये या केंद्राच्या उभारणीचे काम केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे एक हजार खाटांपैकी ३०० खाटा या आॅक्सीजन बेड असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी असे एकूण ३०० कर्मचारी २४ तास कार्यरत असतील.तसेच आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी गरजेनुरूप उपलब्ध केल्या जातील. सध्या या जम्बो फॅसिलिटी उपचार केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. या महिना अखेरीस हे उपचार केंद्र कार्यान्वित होईल, असे अपेक्षित आहे.>केंद्र उभारणीतील अडचणींवर मातमुंबईतील व मुंबईलगतच्या परीसरातील महत्त्वाच्या बाजारपेठा सध्या नियंत्रित स्वरूपात सुरू असल्याने हे उपचार केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून घेण्यात पालिकेला अनंत अडचणी आल्या.मात्र पालिकेच्या अभियंत्यांनी त्या अडचणींवर मात करत हे उपचार केंद्र उभारण्याच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही, अशी माहिती ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली.>महापालिकाअभियंत्यांचे कौशल्यतब्बल एक हजार खाटांचे हे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केंद्र उभारण्यास १० जून २०२० रोजी सुरुवात करण्यात आली. पालिकेचे काही अभियंते - कामगार - कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस काम करीत आहेत. या महिनाअखेरीस हे उपचार केंद्र सुरू होत असल्याने केवळ १५ ते २० दिवसांत या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
CoronaVirus News : भायखळ्यात एक हजार खाटांचे ‘जम्बो फॅसिलिटी’ उपचार केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 2:04 AM