मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी ३,०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे, तर दिवसभरात १,१९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १४ हजार ६०० झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.
राज्यात रविवारी ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, एकूण संख्या १,६३५ झाली आहे.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २,२८३ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण १६ हजार ९१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी ६६.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
५४,४४० रुग्ण देशात झाले बरे
भारतात शनिवारी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४,४४० वर गेली आहे. देशात कोरोनाने आजवर ३,८६७ बळी घेतलेले आहेत. देशात एकूण १,३१,८६८ जणांना कोरोनाने ग्रासले होते. सध्या ७३,५६० रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. आंध्रात २,७५७, बिहारमध्ये २,३८०, तर उत्तर प्रदेशात ६,०१७ रुग्ण आहेत.
अमेरिकेत मृत्यू १ लाखाजवळ
अमेरिकेतील मृतांची संख्या १ लाखाच्या जवळ गेली. त्या देशात ९८,७५० मृत्यू झाले. तेथे एकूण १,६७,४०२ जण बाधित आहेत. जगातील एकूण रुग्णसंख्या ५४ लाख ४० हजारांवर गेली आहे. जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३,४४,५६० झाली.