CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेत नसलेल्या मुंबईतील प्रवाशांचेही झालेत हाल-बेहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 01:48 AM2020-10-08T01:48:13+5:302020-10-08T01:48:31+5:30
शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या, अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे सध्या हाल-बेहाल झाले आहेत.
- राज चिंचणकर
मुंबई : मुंबईबाहेरून मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे, अतिरिक्त भुर्दंड सोसण्यासह एकंदर हाल सुरू आहेतच; पण त्याचबरोबर मुंबईतल्या मुंबईत सर्वकाही आलबेल आहे, अशी अजिबात स्थिती नाही. शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या, अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे सध्या हाल-बेहाल झाले आहेत.
अत्यावश्यक सेवेत न येणाºया प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे; त्यामुळे या प्रवाशांचा सगळा भार बेस्ट बस, टॅक्सी आदी सेवांवर पडत आहे. रोजचे टॅक्सीचे भाडे परवडत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी बेस्ट बससेवेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. मात्र या बस अपुºया पडत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या थांब्यावर बसमध्ये प्रवासी भरल्यावर, बसमध्ये जास्त गर्दी नको म्हणून अनेक बस पुढील थांब्यावर न थांबता थेट पुढच्या मार्गाला लागताना दिसतात.
मध्य मुंबईतील माहीम, दादर, प्रभादेवी, परळ या विभागांचे घेता येईल. माहीम ते गडकरी चौक यामधील थांब्यांवर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत बस न थांबण्याचे प्रमाण मोठे आहे. याचे कारण म्हणजे माहीमहून दादर, परळ, प्रभादेवी, वरळी परिसरात जाणाºया बस आधीच प्रवाशांनी भरून आलेल्या दिसतात. परिणामी, मधल्या थांब्यांवर या बस अजिबात थांबत नाहीत. अशा वेळी केवळ थांब्यावर हतबलतेने उभे राहून, थेट पळणाºया बसकडे पाहण्याशिवाय प्रवाशांकडे गत्यंतर उरत नाही. या मार्गावर एसटीच्या तुरळक बस चालवलेल्या दिसतात; मात्र त्याही गर्दीच्या वेळी थांबत नसल्याचे आढळून येते.
माहीम परिसरातून अनेक प्रवाशांना परळच्या वाडिया, केईएम, टाटा आदी रुग्णालयांत जायचे असते. मात्र सकाळ व संध्याकाळच्या वेळेत तिथे जाणाºया बस शितलादेवी, सिटीलाइट, गडकरी चौक आदी थांब्यांवर थांबत नसल्याने, या प्रवाशांना टॅक्सीखेरीज पर्याय उरत नाही. अनेकांना या रुग्णालयांतील त्यांच्या आप्तांसाठी ‘आवश्यक तो प्रवास’ करायचा असतो; त्यांची अवस्था तर बिकटच आहे. केवळ परळच नव्हे; तर सकाळी शितलादेवीहून प्रभादेवी, वरळीकडे जाणाºया प्रवाशांचीही बस थांबतच नसल्याने तीच स्थिती आहे. अशा वेळी, बसथांब्यावर तासन् तास बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांमधून संतप्त सूर ऐकू येतो. मात्र सध्या तरी मध्यमवर्गीय प्रवाशांना एक तर टॅक्सीने जा किंवा थेट पायपीट करा, याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
संध्याकाळच्या वेळीही या स्थितीत काही बदल दिसून येत नाही. परळहून संध्याकाळी उपनगरांकडे पूर्णत: भरून जाणाºया बस पाहिल्या की एकंदर चित्रच स्पष्ट होते. परळहून येणाºया बस हिंदमाता, दादर टीटी आदी थांब्यांवर अजिबात थांबत नाहीत. त्यामुळे माहीमकडे जाणाºया प्रवाशांना संध्याकाळ उलटून जाईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. उपनगरे किंवा नवी मुंबई परिसरात जाणाºया बस संध्याकाळी तुफान भरून वाहतात. बसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे तीनतेरा वाजलेले दिसतात.
बसचा ४ चा पाढा...
माहीमच्या एल.जे.मार्गावरून दिवसभर ४, ४० व ४४० या क्रमांकाच्या नव्याकोºया बस चालवलेल्या दिसून येतात. अर्थात, त्याही प्रवाशांनी भरून वाहत असतात. या बस पाहून तर, आपल्या नेहमीच्या मोठ्या बसगाड्या गेल्या कुठे, असा प्रश्न प्रवाशांना पडलेला दिसतो. ४, ४० व ४४० याव्यतिरिक्त क्रमांकांच्या बसची वाट पाहणाºया प्रवाशांना, बसच्या या ४च्या पाढ्याचे गणित काही सुटत नाही. लागोपाठ फक्त या तीन मार्गावरील बस सतत कशा काय येतात, याचे कोडे प्रवाशांना उलगडत नाही.